पिंपरी (Pclive7.com):- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारल्यामुळे तळेगावातील एल अँड टी कंपनी प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याने 40 दिवसांहून अधिक दिवस कामगारांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. परंतु, आजतागायत कंपनीकडून कामगारांना कोणतेही सहकार्य केले नाही. या प्रकरणात लक्ष घालून स्थानिक कामगार भूमिपूत्रांना न्याय देण्याची मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, कामगारमंत्री सुरेश खाडे आणि पुणे कामगार आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे येथे एल अँड टी कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत स्थानिक भूमीपूत्र कामगार काम करतात. हे कामगार केल्या सात ते आठ वर्षांपासून कंपनीत कार्यरत आहेत. कंपनीने मागील काही महिन्यांपासून कामगारांची पिळवणूक, शोषण करण्याचे काम चालू केले होते.
त्यासाठी कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले. त्याचा राग आल्याने कंपनीकडून कामगारांच्या विविध ठिकाणी बदल्या करणे, कामावरुन काढणे, मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे न्याय, हक्कांसाठी या कंपनीच्या विरोधात स्थानिक भूमीपूत्र कामगारांनी 19 ऑक्टोबर 2022 पासून पुण्यातील कामगार आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले. उपोषणाला सव्वा महिना उलटून गेला. तरी, अद्यापही कंपनीद्वारे कोणतीही सहकार्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळे आपण यामध्ये लक्ष घालून भूमीपूत्र कामगारांना न्याय द्यावा, अशी विनंती खासदार बारणे यांनी केली.
भारतीय कामगार सेनेच्या कामगारांसाठी खासदार बारणे मैदानात
भारतीय कामगार सेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे. तरी, देखील कामगारांना न्याय मिळावा यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे मैदानात उतरले आहेत. कामगारांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. कामगारांच्या बाजूने, त्यांच्या हक्कांसाठी खासदार बारणे उभे राहिले आहेत. कामगार माझ्या मतदारसंघातील आहेत. कामगार कोणत्या पक्षाचे काम करतात याही पेक्षा ते सर्वसामान्य कामगार आहेत. त्यांच्यावर कंपनी प्रशासनाकडून अन्याय होत आहे. कामगारांवरील अन्याय सहन करणार नाही. याबाबत उद्योगमंत्री, कामगार मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे लवकरच या कामगारांना दिलासा मिळेल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.