पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (पुणे विभाग) यांच्या वतीने वाकड येथील The Gazebo World of Veg येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व भव्य करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत योग्य दिशा मिळावी तसेच पालकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
जागतिक स्तरावरील HR तज्ज्ञ व AI रणनीतीकार डॉ. संग्रामसिंह पवार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक करिअर संधी याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. करिअर समुपदेशक रचना सारंग पाटील यांनी विद्यार्थ्यांची मानसिक तयारी, व्यक्तिमत्व विकास आणि योग्य करिअर निवड याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

IMA महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील संधी, आरोग्य आणि करिअर नियोजन या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर शौर्यचक्र व सेना मेडल सन्मानित कर्नल सचिन रंदले यांनी सैन्यदल, UPSC आणि स्पर्धा परीक्षांमधील करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.
माणुसकीची चळवळचे अध्यक्ष राज देशमुख यांनी राष्ट्रनिर्माण, सामाजिक नेतृत्व आणि युवकांची जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी आणि पालकांनी तज्ज्ञांशी थेट संवाद साधून विविध शंकांचे निरसन केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा, आधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री करण्याचा आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमास अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनचे ट्रस्टी संदीप नवसुपे, बाबा जाधव, आनंद गुळुमकर, स्नेहल गायकवाड आणि ओंकार देशमुख उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अँड.अश्विनी शेवाळे लाड ,राहुल पवार, संदीप निकम, अतुल बिराजदार, सुभाष पाटील, अमर भोसले, रवी साळुंखे, महेश पाटील, कैलास बाकेल, गणेश गायकवाड, अमोल भोसले, प्रशांत माने, प्रमोद साबळे आणि अमृत शिंदे निलेश देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.




















Join Our Whatsapp Group