पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात भरलेल्या संकष्टी चतुर्थी यात्रेत कथितपणे ‘Made in Pakistan’ लेबल असलेली चादर विक्रीसाठी आल्याचा दावा समोर आला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडिओमध्ये एका महिलेने यात्रेतून खरेदी केलेल्या चादरीवर ‘Made in Pakistan’ असे लेबल आढळल्याचा दावा केला आहे. संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, चादर धुतल्यानंतर तिच्या एका कोपऱ्यात लपवलेले हे लेबल दिसून आले. देशात पाकिस्तानी वस्तूंवरील निर्बंध आणि संवेदनशीलता लक्षात घेता अशा वस्तू स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कशा उपलब्ध झाल्या, असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, यात्रेतील तसेच रस्त्यावरील स्टॉल्सवर विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या वस्तूंची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अनेकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तूंचा उगम, पुरवठा साखळी आणि विक्रेत्यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणातील दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित चादरीवरील लेबलची सत्यता, वस्तूची आयात प्रक्रिया आणि ती बाजारात कशा मार्गाने पोहोचली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही नागरिकांनी सोशल मीडियावरील दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी वस्तुस्थितीची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत पोलिस तक्रार दाखल झाल्याची माहिती नाही. तथापि, व्हायरल व्हिडिओमुळे या विषयाची चर्चा सुरू झाली असून, प्रशासनाने याची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group