पिंपरी (Pclive7.com):- समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत सौ. निशा अनिकेत प्रभु यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सलग दुसऱ्यांदा केसदान करून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. कॅन्सरवरील उपचारांमुळे केस गमावलेल्या रुग्णांना आत्मविश्वास मिळावा आणि त्यांच्यासाठी विग तयार करता यावेत, या उद्देशाने त्यांनी आपल्या केसांचे दान केले.

यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्येही त्यांनी मुंबई येथील ‘मदत ट्रस्ट’च्या माध्यमातून केसदान केले होते. त्या वेळी त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची विविध माध्यमांनी दखल घेतली होती. समाजात केसदानाबाबत जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, या हेतूने त्यांनी पुन्हा एकदा केसदान करण्याचा निर्णय घेतला.
दीर्घकाळ केस वाढवून त्यांची योग्य निगा राखल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा केसदान केले. या केसांचा उपयोग कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी विग तयार करण्यासाठी होणार आहे. उपचारांच्या काळात अनेक रुग्णांचा आत्मविश्वास कमी होतो. अशा परिस्थितीत केसदानासारखे योगदान त्यांना मानसिक बळ देण्यास आणि आत्मविश्वास पुनर्संचयित करण्यास मदत करते.

सौ. निशा प्रभु या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. समाजोपयोगी कार्यातून त्यांनी नेहमीच सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. “रक्तदान, अवयवदान याप्रमाणेच केसदान देखील समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या छोट्याशा योगदानातून एखाद्या रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य आणि आत्मविश्वास परत येऊ शकतो,” असे मत निशा प्रभु यांनी व्यक्त केले. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजात केसदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचत असून कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group