पिंपरी (Pclive7.com):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्यावर समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीचा चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच धसका घेतलेला दिसत आहे. आपल्यावर परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी पाटील यांनी घेतली आहे.
चंद्रकांत पाटील आज सांगवी येथे सुरू असलेल्या पवनाथडी जत्रेला भेट देण्यासाठी आले होते. यावेळेस त्यांनी लावलेल्या फेसशिल्डने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पाटलांनी चक्क फेसशिल्ड लावले होते. आपल्यावर पुन्हा शाईफेक झाल्यास कोणतीही गंभीर इजा होऊ नये, यासाठी पाटलांनी ही खबरदारी घेतली आहे. कोरोना काळात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही अशाच प्रकारचा फेसशिल्डचा वापर केला होता. दरम्यान पाटलांचा फेसशिल्ड हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.