पिंपरी (Pclive7.com):- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी येत असून त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जयंती निमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांच्या बाबतीत बैठकीचे आयोजन केले आहे. सदर बैठक सोमवार २६ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकर पवळे स्थायी समिती सभागृहात आयोजित केली आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या विविध कार्यक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
तरी या नियोजन बैठकीसाठी शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.