पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीसाठी काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे इच्छुक आहेत. त्यांनी याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची भेट घेऊन त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास सर्वतोपरी ताकद पणाला लावून लढा देण्याचा निर्धार सायली नढे यांनी व्यक्त केला आहे.
चिंचवड विधानसभा भाजपचे आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघाची राज्य निवडणूक आयोगाने पोट निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.
या जागेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला शहराध्यक्षा सायली नढे जोरदार तयारीला लागल्या आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह शहरातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा सुरू केली आहे. महिला काँग्रेसच्या वतीने शहरात विविध सामाजिक मुद्द्यांवर नढे यांनी कायमच आवाज उठवला. शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले. महिला सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे प्रयत्न केले.
तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा त्यांनी सन्मान केला. रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. याची दखल पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी घेतली. त्यांच्या या कार्याचे कौतुकही शहरासह राज्यातील नेत्यांनी केले.
आता त्या चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची त्या वाट पहात असून पक्ष जो निर्णय घेईल. तो मान्य असेल, असे नढे यांनी पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.