पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून आज गुरुवारी (दि.९) स्थानिक पातळीवरील नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यास यश आले नाही. त्यामुळे कलाटे निवडणूक लढविण्याबाबत आजपर्यंत ठाम होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना माघार घेण्याबाबत बोलणार आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवणूक येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी होत आहे. कलाटे यांनी माघार न घेतल्यास प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
पक्षाचे निरिक्षक, आमदार सुनील शेळके यांनी कलाटे यांच्याशी अजित पवार यांनी बोलावे, अशी त्यांना विनंती केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी रात्री किंवा आज शुक्रवारी (दि.१०) सकाळी कलाटे यांच्याशी माघार घेण्याबाबत बोलणार आहेत. तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पुणे व पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर आज सकाळी १० वाजता कलाटे यांच्याशी शहरात येवून बोलणार आहेत. यावेळी अहिर माघार घेण्यासाठी कलाटे यांची पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबरोबर मोबाईलद्वारे चर्चा घडवून आणू शकतात. त्यामुळे राहुल कलाटे आज शेवटच्या दिवशी काय भूमिका घेणार? उमेदवारी मागे घेणार की बंडखोरी कायम ठेवणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.