चिंचवड (Pclive7.com):- बंडखोर राहुल कलाटे यांना आगामी मावळ लोकसभेची उमेदवारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची आमदारकी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते थांबले नाहीत. शेवटी अजितदादांचा बारामती विधानसभेचा राजीनामा घेऊन तिथली जागा ‘या’ बंडखोराला देणं फक्त बाकी होतं असा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी केला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पिंपळे निलख येथे जाहिर सभा संपन्न झाली. याप्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले आदी उपस्थित होते.
सुनिल शेळके म्हणाले, चिंचवडची उमेदवारी जाहिर होण्यापूर्वी पहाटे दोन वाजेपर्यंत अजितदादा पवार बंडखोर राहुल कलाटे यांना विनंती करत होते. महापालिका निवडणुक तोंडावर आहे. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले होते. आगामी लोकसभेची तयारी करा, बंडखोरी करू नका अशी विनंती केली. स्थानिक स्वराज्य संस्थेतून अनिल भोसलेंची जागा रिक्त झालीय ती जागा देतो असेही सांगितले. मात्र पठ्या थांबायला तयार नव्हता.
ते पुढे म्हणाले “मग मी नेत्यांना सांगितलं हे काय थांबणार नाहीये. एखाद्याने झोपायचं सोंग घेतलं तर उठवता येत नाही. मग शेवटी एक पर्याय काढा म्हटलं. दादा तुम्ही बारामतीच्या विधानसभेचा राजीनामा द्या आणि तिथली जागा या बंडखोराला द्या. कारण आता आमच्याकडं द्यायला तेवढच होतं बाकी दुसरं काही नव्हतं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की, जे बंडखोर म्हणून उभे राहिले त्यांनी सुरूवातीला आमच्यावर टीका केली. ही लढत नुराकुस्ती असल्याचे म्हटले. ज्यावेळेला माघारीचा काळ संपला तेव्हा बंडखोर म्हणायला लागला की आमच्यावर अन्याय झाला. मुळातचं सगळीकडं फिरून आलेला हा महाशय आहे. तरीही यांची बाजू मांडणारा मीच होतो. हा बंडखोर फक्त महाविकास आघाडीची मतं खायला उभा राहिलेला आहे. स्वत:च्या हितासाठी हा उभा राहिला आहे. कुणी उभे केले, काय त्यांचा अजेंडा जनतेपुढे सांगावे” असे सुनील शेळके शेवटी बोलताना म्हणाले.