पिंपरी (Pclive7.com):- अहंकारामुळेच राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता गेली.. मला काय अहंकारी म्हणता या शब्दात राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना सणसणीत टोला लगावला आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर टीका केली. बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे अहंकाराची भाषा बोलत आहेत. त्यांना जेमतेम वीस हजार मते पडतील. नागरिक अहंकार स्वीकारत नाहीत. अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात विकासकामे केली असल्याने राष्ट्रवादीला निवडून आणणार असल्याचे वातावरण नागरिकांमध्ये आहे. असे ते म्हणाले होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी त्यांना तितक्याच कडवट भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
मला अहंकारी असे संबोधणाऱ्या राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करावे. सन 2017 च्या महापालिका निवडणुकीत अति अहंकार आणि फाजील आत्मविश्वास, भ्रष्टाचार यामुळेच राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली व भाजपाच्या हाती माकडाच्या हाती यावे तसे कोलीत आले. हे जनतेला चांगले माहित आहे, असे कलाटे यांनी म्हटले आहे.
मागील निवडणुकीत मी खुद्द लक्ष्मण जगताप समोर असताना त्यांच्या विरोधात एक लाख बारा हजार मते घेतली होती. त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने माझे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी मला राष्ट्रवादीतील काही नतदृष्टांच्या कारवायांमुळे उमेदवारी नाकारण्यात आली. चिंचवड मतदार संघात आपली ताकद असल्याचा अहंकार राष्ट्रवादीला झाला आहे. मात्र मतदारसंघातील मतदार सुज्ञ ,सुशिक्षित आहे हा मतदार राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा टोला कलाटे यांनी हाणला आहे.
घोडामैदान फार लांब नाही, मला जेमतेम 20 हजार मते मिळतील असे म्हणणाऱ्यांना मतदानातून उत्तर मिळेल असे कलाटे यांनी म्हटले आहे.
शहरात अजित पवार व राष्ट्रवादीने विकास कामे केली आहेत. त्या बळावर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असे रोहित पवार म्हणतात. मात्र राष्ट्रवादीने विकास कामे केली असती तर 2017 च्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड मधील जनतेने राष्ट्रवादीला का नाकारले असते याचे उत्तर रोहित पवार यांनी दिले पाहिजे असा टोलाही कलाटे यांनी हाणला आहे.
गेल्या पाच वर्षात महापालिकेची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी भाजपबरोबर सेटिंग करून अनेक ठेके मिळविले. त्या बदल्यात पालिकेतील भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केली. या उलट मी महापालिकेत नगरसेवक या नात्याने अनेक चुकीच्या कामांना विरोध केला त्या विरोधात आवाज उठवला याची आठवण कलाटे यांनी करून दिली.