(संदेश पुजारी – Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेले काही दिवस वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची ‘फॅशन’ सुरु झाली आहे. त्याच क्रमवारीत स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने सीमा सावळे यांचे ही जोरदार शक्ती प्रदर्शन झाले. अर्थात त्यात काही गैर नसले तरी शहरात ज्या पद्धतीने ‘फ्लेक्सबाजी’ झाली ती पाहता सीमा सावळे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय हे उघड गुपित आहे…!
पिंपरी राखीव मतदार संघातल्या त्या ‘प्रबळ’ दावेदार असल्या तरी वाढदिवसाचा ऐकूण ‘ताम जाम’ पाहता सीमा सावळे फक्त पिंपरीच नाही तर शहरात येणाऱ्या सर्वच मतदार संघावर ‘नजर’ ठेवत आहेत की काय? अशी शंका उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही..! काही जणांना ही अतिशोक्ती वाटू शकते पण राजकारणात काही ही अशक्य नसते. याप्रमाणे सीमा सावळे पिंपरी नाही तर चिंचवड किंवा भोसरीच्या उमेदवार झाल्या तरी कोणाला आश्चर्य वाटायला नको अशी स्तिथी आहे..!
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होतील असा कयास बांधला जात आहे.त्यामुळे उद्या आमदार लक्ष्मण जगताप लोकसभेसाठी उभे राहिले आणि चिंचवडमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी वाढली आणि प्रचंड ‘वादंग’ निर्माण व्हायची शक्यता झाली तर सर्वात विश्वासू म्हणून सीमा सावळे चिंचवड मधून उमेदवार होऊ शकतात. ही शक्यता कोणी नाकारू शकत नाही. प्राप्त स्तिथीत ती वास्तववादी वाटत नसली तरी ती शक्यता आहे हेही तेवढेच खरे..! पिंपरी विधानसभेसाठी खासदार अमर साबळे स्वत: किंवा त्यांची मुलगी वेणू साबळे यांना ‘लाँच’ करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे पिंपरीत ‘वाद’ घालत बसण्यापेक्षा चिंचवड ‘सेफ’ हा विचार सावळे करणार नाहीत असं ही नाही.
भोसरीमध्ये सीमा सावळे उभ्या राहतील अशी शक्यता सध्या तरी वाटत नाही. परंतू महेश लांडगे लोकसभेला उभे राहिले आणि एकनाथ पवारांना विरोध होऊ लागला तर सावळे यांचे नाव पुढे येऊ शकते. अर्थात सीमा सावळे ज्या भागाच्या नगरसेविक म्हणून प्रतिनिधित्व करतात तो भोसरी मतदार संघात येतो म्हणून ही पुसटशी कल्पना आहे. त्याला भोसरीमध्ये झालेल्या ‘फ्लेक्सबाजी’चा आधार आहे तो वेगळा…! आता सीमा सावळे यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे त्यांनाच माहीत पण वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या ‘शक्ती’प्रदर्शनाने अनेकांचे ‘धाबे’ दणाणलेत हे मात्र खरे…!