पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांच्यापाठोपाठ आयुक्त श्रावण हर्डीकर स्वीडन देशाच्या दौर्यावर जाणार आहेत. हा दौरा २० ते २६ नोव्हेंबर या कालावधीत आहे.
महिला व बाल कल्याण समितीने सिंगापूरचा दौरा केल्यानंतर महापालिकेच्या नगरसेवकांसह पदाधिकारी व अधिकार्यांनी गुजरातमधील अहमदाबाद शहरात बीआरटीचा अभ्यास दौरा केला. या दौर्यात आयुक्तही सामील झाले होते. त्या पाठोपाठ सोमवारपासून दि.१३ पासून स्पेन देशात सुरू झालेल्या जागतिक स्मार्टसिटी परिषदेसाठी महापौर नितीन काळजे सहभागी झाले आहेत.
त्यांच्यापाठोपाठ आयुक्त हर्डीकर हे स्वीडन येथे होणार्या प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. ही प्रशिक्षण कार्यशाळा २० ते २६ नोव्हेंबर या कालावधीत आहे. ते गैरहजर असताना महापालिकेच्या आयुक्तपदाचा भार कोणाकडे सोपविला जाणार याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. सध्या अतिरिक्त अच्युत हांगे यांचे पद रिक्त आहे. सह आयुक्त दिलीप गावडे यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते गैरहजर आहेत. दरम्यान, अहमदाबाद बीआरटीच्या एक दिवसाच्या दौर्यादरम्यान आयुक्तांनी आपला पदभार कोणाकडेही सोपविला नव्हता. मात्र आताचा स्वीडन दौरा तब्बल ७ दिवसांचा आहे. त्यातील २० ते २४ नोव्हेंबर हे पाच दिवस कामकाजाचे आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा भार ते कोणाकडे सोपवून जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.