मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांनी यासंदर्भात एक सूचक विधान केलं आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, ज्या ज्या खात्यात बाळासाहेब देसाई यांनी काम केलं, त्या खात्यात क्रांतीकारी काम करून त्यांनी निश्चितपणे आपला वेगळा ठसा राज्यात आपल्या सर्वांसमोर मांडला. माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाची त्यांच्यांकडे सोपवलेली जबाबदारी म्हणजे १९७७-७८ या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम.
सातत्याने माझा उल्लेख सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष म्हणून झाल्यामुळे माझं वय सगळ्यांनाच माहिती असेल. ७७ साली माझा जन्म झाला आणि त्याच वर्षी बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ज्या प्रमाणे त्यांनी राजकीय आयुष्यात क्रांतीकारी निर्णय घेतले, त्यातून बरंचसं शिकून कदाचित मीही लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
यावेळी समोर बसलेले गिरीश महाजन यांनी डोक्याला हात लावला. हे पाहून नार्वेकर म्हणाले, ‘चिंता करायची गरज नाही. निर्णय काय असेल ते सांगितलेलं नाही’. त्यावर गिरीश महाजन हसत म्हणाले ‘मेरिटवर निर्णय घेईन’, असं सांगून टाका.