पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट २ ने कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल, सोनसाखळी, वाहनचोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केल आहे. त्यांच्याकडून चार कोयते, चार दुचाकी, एक तलवार, सात मोबाईल, सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी मोहम्मद मुस्ताक सिद्दिकी (वय २४, रा. यहिया कॉलनी, पटेलनगर लातूर), पांडुरंग बालाजी कांबळे (वय २३, मु.पो. गौर ता.निलंगा, जि.पुणे), तुषार उर्फ बाळ्या अशोक माने (वय २४, रा.वराळे रोड, समता कॉलनी, तळेगाव दाभाडे) आणि अर्जुन संभाजी कदम (वय २५, नेवाळे वस्ती, केशवनगर चिखली) यांना अटक केली असून त्यांच्या इतर चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी, भोसरी, चिखली परिसरामध्ये दुचाकी अडवून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला अखेर जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आले आहे. आरोपी दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत असल्याचा एक सीसीटीव्ही समोर आला, त्यानंतर आरोपींच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट २ ने आवळल्या आहेत.
याप्रकरणी सोन्याचे दागिने विकणारा आणि विकत घेणाऱ्या व्यक्तीला देखील आरोपी करण्यात आले आहे. मनोज सोलंकी आणि मुराद दस्तगीर मुलानी यांना ताब्यात घेतला आहे अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोन ने दिली आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार दिपक खरात, प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, आतिष कुडके, नामदेव कापसे, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंडे, संदेश देशमुख, उध्दव खेडकर यांनी केली आहे.