पिंपरी (Pclive7.com):- “लोकशाही” ही फक्त वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी किंवा शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अभ्यासणे एवढाच नसून तर एक जागरूक नागरिक बनून ती आत्मसात करून जगणे होय असे प्रतिपादन माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केले.

आज शुक्रवार (दि.०१) रोजी चिंचवड येथील वेबगेओर शाळेतील विद्यार्थ्यांनी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी “लोकशाही” याविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी घेतले. त्यावेळी काटे बोलत होते. वेबगीयोर या शाळेतील विद्यार्थ्यांना “लोकशाही” या विषयी जाणून घेण्याबद्दलची उत्सुकता बघून नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचे मन प्रसन्न झाले. आजची ही लहान मुलेच पुढच्या काळात आपल्या देशातील लोकशाहीला अधिकची ताकद देणारे एक जागरूक नागरिक बनणार आहेत हे पाहून मन प्रसन्न झाले.
शत्रुघ्न काटे वेबगीयोर शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. जी विविधता आणि सहभागाचे उल्लेखनीय मिश्रण दर्शवते. सामाजिक जीवनामध्ये लोकशाहीच्या मार्गाने देश कसा चालतो, लोकशाही कशी टिकवावी, लोकशाही समोरील आव्हाने आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोप्या शब्दात लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन असते. लोकशाहीत सर्वस्वी अधिकार जे जनतेच्या हातात असते म्हणजे प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य म्हणजे लोकशाही होय. भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी प्रचंड मतदान हा खरोखर एक प्रभावी मार्ग आहे. लोकांनी संकोच टाळून मतदानासाठी बाहेर पडावे. मोठ्या प्रमाणात मतदान हेच भारतीय राजकारणात सर्वसामान्य लोकांचा लक्षणीय सहभाग दर्शविण्याचे माध्यम ठरू शकते.
तसेच शत्रुघ्न काटे यांनी शालेय विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व पटवून देतांना आवाहन केले की, लोकशाही ही फक्त वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी किंवा शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अभ्यासणे एवढाच नसून तर एक जागरूक नागरिक बनून ती आत्मसात करून जगणे होय. आपल्या भारतीय लोकशाहीची अनेक वैशिष्टय़े असली तरी तिला आव्हानांचाही सामना करावा लागतो. भ्रष्टाचार, जातीयवाद, गरिबी आणि निरक्षरता हे काही अडथळे आहेत, जे भारतातील लोकशाही मार्गात अडथळे निर्माण करतात. तथापि, या आव्हानांना न जुमानता, लोकशाहीप्रती भारताची बांधिलकी स्थिर राहिली असून राष्ट्र आपल्या लोकशाही संस्थांचा विकास आणि बळकटीकरण करत आहे.
यावेळी शत्रुघ्न काटे यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली याबद्दल चिंचवड वेबगीयोर शाळा प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
Tags: पिंपळे सौदागरमाजी नगरसेवक शत्रुघ्न काटेरहाटणी - पिंपळे सौदागरलोकशाहीलोकशाहीचे महत्त्वशत्रुघ्न काटे






















Join Our Whatsapp Group