पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवापूर्वी निगडी ते दापोडी रस्त्यांवरील खड्डे बुजवा, रस्त्याचे डांबरीकरण करा, अशी मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.
सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडीतील भक्तीशक्ती चौक ते दापोडी हा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित करण्यात यावा. तसेच भक्तीशक्ती चौक ते दापोडी या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करण्यात यावे.
निगडी ते दापोडी हा शहरातील मुख्य रस्ता असून कामगार वर्ग, विद्यार्थी वर्ग, त्याचप्रमाणे महिला वर्ग हा रस्ता वापरत असून आता सध्या ह्या रस्त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे. सदर रस्ता मुख्य दळणवळणाचा भाग असून हा रस्ता विकसित करून सुशोभीकरण करण्यात यावा. तसेच या रस्त्यावर योग्य त्या अंतरावर ठिकठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात यावी. या मार्गावर ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले असून त्यातून गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा मार्ग संपूर्णपणे डांबरीकरण करावा अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.