पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने दरवर्षी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे पुणे – शिवनेरी – पुणे अशा २०० किमी सायकल राईडचे आयोजन करते. यावर्षी ५७५ सायकल स्वरांनी यामध्ये सहभाग घेतला. सदर वर्ष पुणे ते शिवनेरी या राईडचे चौथे वर्ष आहे. पर्यावरण आणि आरोग्य याचा संदेश समाजामध्ये देत सदर सायकल स्वारी मार्गक्रमन करते. एका दिवसामध्ये तब्बल १०० किलोमीटर अंतर पाच ते सहा तासांमध्ये पार केले. शनिवार २ सप्टेंबर रोजी मोशी येथील गोडाऊन चौक येथून सकाळी सहा वाजता सदर सायकल राईडला झेंडा दाखवून सुरुवात झाली. यावेळी आयएएसचे अजित पाटील, गणेश भुजबळ उपस्थित होते.

आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक प्रसंगाला इतिहासात अतिशय महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून १७ ऑगस्ट १६६६ साली सुटले होते. या घटनेला यावर्षी ३५६ वर्ष पूर्ण झाली. ते आग्रा येथून निघून मथुरा, प्रयागराज, वाराणसी, गया, कटक, हैदराबाद, मलखेड, विजयपूर, गोकर्ण, पन्हाळा आणि राजगड किल्ला असे तेराशे किलोमीटर अंतर तेरा दिवसांमध्ये पार करुन राजगडावर ३० ऑगस्ट रोजी पोचले होते. याच महाराजांच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी आम्ही दरवर्षी पुणे ते शिवनेरी राईड आयोजित करतो असे आयएएसचे सदस्य गजानन खैरे यांच्यातर्फे सांगण्यात आले.
पुणे ते शिवनेरी सायकल मार्ग :- नाशिक फाटा – राजगुरुनगर – मंचर – नारायणगाव – शिवनेरी. असा होता.अष्टविनायका मधील लेण्याद्री करून सर्व सायकलिस्ट ओझर येथे मुक्कामसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास संपन्न झाला. असे आयएएस शिवनेरी सायकल राईडचे प्रमुख मदन शिंदे, दादासाहेब नखाते, प्रशांत तायडे आणि अविनाश चौगुले यांच्या तर्फे सांगण्यात आले.
नियोजनामध्ये गिरीराज उमरीकर, अमित पवार, रमेश माने, सुशील मोरे, श्रीकांत चौधरी, मारुती विधाते, प्रतीक पवार, सुशील मोरे, श्रेयस पाटील, अजित गोरे, बाळासाहेब तांबे, काळूराम नढे, अमित पवार, अविनाश अनुशे, प्रणय कडू ,श्रीकांत चौधरी, प्रदीप टाके, प्रतीक पवार, कैलास तापकीर, प्रकाश कांबळे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरु सायकल क्लब, नारायणगाव येथे साई संस्थान व शिवनेरी ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे स्वागत करण्यात आले. श्रीराज हॉटेल तर्फे सर्वांना मसाला दूध देण्यात आले.





















Join Our Whatsapp Group