पिंपरी (Pclive7.com):- ताथवडे येथील पंडीत ऑटोमोटिव्ह कंपनीला औद्योगिक न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत कंपनीच्या चल किंवा अचल मालमत्तेबाबत कोणाही त्रेयस्त पक्षाचा हक्क प्रस्थापित करण्यात येऊ नये असा तात्पुर्ता मनाई आदेश दिला आहे.
हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, अँड. गौरव पोळ, शांताराम कदम, गजानन जोध, हमिद ईनामदार आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना कैलास कदम म्हणाले की, मे. पंडीत ऑटोमोटिव्ह प्रा.लि. या कंपनी विरूध्द त्यांच्या काही कामगारांनी दि.३० नोव्हेंबर रोजी त्यांचे थकीत असलेले ५ महिन्यांचे वेतन, दिवाळी बोनस व इतर अनुषंगिक फायदे मिळावेत यासाठी औद्योगिक न्यायालय पुणे यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आदेश देताना न्यायालयाने कामगारांच्या नोकर्यांना संरक्षण दिले होते. तसेच ४ डिसेंबर रोजी कंपनीच्यावतीने त्यांच्या अधिकार्यांनी कामगारांची बदली करण्याचा कंपनीचा विचार नसल्याचे सांगितले. न्यायालयाने ४ डिसेंबर रोजी मनाई आदेश वाढवून देऊन कामगारांच्या नोकरीस संरक्षण दिले. तरीही दि.५ डिसेंबर रोजी पंडीत ऑटोमोटिव्ह प्रा.लि. व्यवस्थापनाने सायंकाळी उशिराने तडकाफडकी टाळे ठोकल्याने ३०० कामगार रस्त्यावर आले आहेत.
न्यायालयात तक्रार अर्ज प्रलंबित असूनही कंपनीच्या अशा टोकाच्या भूमिकेमुळे कामगारांना त्यांच्या नोकरीबाबत आणि कंपनीने देय असलेल्या पगार, आणि इतर आर्थिक लाभ मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली. त्यामुळे व्यवस्थापना विरोधात हिंद कामगार संघटनेने ७ डिसेंबर रोजी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. कामगारांचे सर्व आर्थिक लाभ आणि देयके देईपर्यंत कंपनीच्या सर्व चल आणि अचल मालमत्तांची विक्री करण्यास मनाई करण्याबाबत व कंपनीची सर्व कागदपत्रे जप्त करण्याबाबत तात्पुर्ता मनाई करावी अशी विनंती करणारा अर्ज केला. त्या अर्जावर प्रथम औद्योगिक न्यायालय श्री.एस.व्ही.सुर्यवंशी यांनी कंपनीच्या वकिलांना जाब विचारला. परंतू कंपनीने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता अर्जावर जबाब देण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने त्यावर कंपनीने जर कामगारांना त्यांचे आर्थिक देय रक्कम दिली नाही तर कामगारांकडे काय पर्याय आहे असा सवाल करून पुढिल तारखेपर्यंत कंपनीने त्यांच्या चल किंवा अचल मालमत्तेबाबत कोणाही त्रेयस्त पक्षाचा हक्क प्रस्थापित करण्यात येऊ नये असा आदेश न्यायालयाने दिला.
हिंद कामगार संघटने तर्फे अँड. गौरव पोळ यांनी कामकाज पाहिले. पुढील सुनावणी येत्या दि. ५ जानेवारी रोजी होणार असल्याचे अँड.पोळ यांनी सांगितले.