पिंपरी (Pclive7.com):- शहरामध्ये मोठया संख्येने नागरिक भाजपाचे समर्थन करीत आहेत. नागरिकांची कामे कुठे अडणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. भुतकाळातील गोष्टी विसरून नव्या विचारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांचा सन्मान राखून संघटना बळकटीसाठी जोमाने कामाला लागणे आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना दिला. भारतीय जनता पार्टीची शहर (जिल्हा) कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जिल्हा कार्यकारिणी बैठक काल (दि.२३) रोजी मोरवाडी येथील भाजप पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शंकर जगताप बोलत होते. शहरातील कार्यकत्यांना न्याय देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. संघटनेत काम करताना सर्वांनी एकमेकांशी संवाद साधा. स्वर्गिय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी, भाजपाच्या पिंपरी चिंचवड शहर प्रभारी वर्षाताई दहाळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस नामदेव ढाके, माऊली थोरात, शितल शिंदे, संजय मंगोडेकर, शैलाताई मोळक, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र राजापुरे यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संसदेत पारित केलेल्या महिला आरक्षणाचा अभिनंदनपर ठराव मांडण्यात आला. तसेच, नवनियुक्त भाजपा शहर कार्यकारणीचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर, मावळ लोकसभा संयोजकपदी माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव पारीत झाला. तसेच, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर कार्यालय येथे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सूचना पेटी लावण्याबाबत ठराव मांडून त्याबाबत उपस्थितांना सूचना देण्यात आल्या. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्याबद्दल अभिनंदन ठराव बैठकीत मांडण्यात आला.
दरम्यान, “आझादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमाच्या निमित्ताने “मेरी माती मेरा देश” या उपक्रमाच्या आयोजनाबाबत यावेळी माहिती देण्यात आली. तसेच, देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा पंधरवडा” म्हणून आरोग्य कर्मचारी, रक्तदान शिबिर, खेळाडूंचा सत्कार आदी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडून त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याबाबतच्या सूचना शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पदाधिकारी यांना दिल्या. तसेच, नवनियुक्त पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, सदस्यांना यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. बैठकीचे प्रास्ताविक राजू दुर्गे यांनी केले. सुत्रसंचालन संजय मंगोडेकर यांनी तर शितल शिंदे यांनी आभार मानले.