पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट गावांसाठी महापालिकेने डीपी प्लॅन तयार केला आहे. परंतु तो प्लॅन अद्याप विकसित झालेला नाही. त्यामुळे त्रिवेणीनगर, तळवडे भागात वाहतूक समस्येला स्थानिक नागरिक व वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. त्याकरिता त्रिवेणीनगर- तळवडे मार्गाला पर्यायी रस्ता तयार करावा, अशी मागणी शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (दि. २४) पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. या वेळी धनंजय भालेकर यांनी त्रिवेणीनगर- तळवडे रस्त्यावरील कोंडीच्या समस्येबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, त्रिवेणीनगर ते तळवडे रस्ता पुढे चाकण एमआयडीसीला जोडला गेला आहे. तसेच हा रस्ता देहू-आळंदी या मुख्य मार्गाला जोडला जात असल्यामुळे या मार्गावर कायमस्वरुपी वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे सकाळी व सायंकाळी त्रिवेणीनगर, तळवडे चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अनेकांना अपघात झाले आहेत. तसेच स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचाही खूप त्रास सहन करावा लागत आहे.याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे समाविष्ट गावांच्या विकासासाठी महापालिकेने तयार केलेला डीपी प्लॅन विकसित करावा. तसेच महापालिकेने केलेल्या डीपी प्लॅनमध्ये जे रस्ते आरक्षित आहेत. ते रस्ते त्वरित विकसित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदरील समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी भालेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group