पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातील संगणक प्रशासनाने दुरूस्तीचे कारण सांगत उचलून नेल्याचा प्रकार आज घडला. वास्तविक पाहता चालू स्थितीत संगणक असताना गटनेता किंवा त्यांच्या स्वीय सहायकाला तसेच कार्यालयीन शिपाई यांना याबाबत कुठलीच कल्पना न देता प्रशासनाने हा उद्योग केला आहे. सत्ताधार्यांच्या राजकीय दबावातून तडकाफडकी चक्क संगणकच गायब केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगू लागली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तीसर्या मजल्यावर सर्वच पक्षाच्या पदाधिकार्यांची कार्यालये आहेत. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचे कार्यालय देखील याच मजल्यावर आहे. सध्या गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपच्या कारभाराबाबत अनेक वृत्त प्रसिध्द होत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक तसेच सेनेचे नेते मारूती भापकर हे याच कार्यालयातून प्रशासनासोबत पत्रव्यवहार करतात. भाजप पदाधिकर्यांचे खुलेआम सुरू असलेले उद्योग आम्ही उघड करतो, म्हणूनच सुडबुध्दीचे राजकारण करत येथील संगणक गायब केल्याचा आरोप भापकर यांनी केलाय. भाजपच्या या उद्योगी पदाधिकार्यांनी प्रशासनावरती दबाव टाकत संगणक उचलून नेण्यास भाग पाडले असल्याचे भापकर यांचे म्हणणे आहे.
याबाबत सेना गटनेते राहुल कलाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, प्रशासनाने अचानकपणे संगणक जमा करून घेतल्यामुळे शिवसेना नगरसेवक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आता आक्रमक समजली जाणारी शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे पहावे लागेल.