पिंपरी (Pclive7.com):- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील चिंबळी येथे व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याचे पत्र लिहुन त्याने आत्महत्या केली असून सिद्धेश सत्यवान बर्गे असे आत्महत्या केलेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी सिद्धेश बर्गे यांनी आरक्षणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. चिट्टीतील मजकुरात मी कोणाच्या त्रासाला कंटाळुन नाही, तर शासकीय कार्यपद्धतीला कंटाळुन आत्महत्या करत आहे. मराठा आरक्षण मिळावे अशी माझी इच्छा आहे, मराठा बांधवांसाठी हे पाऊल उचलत आहे. असा उल्लेख चिठ्ठीमध्ये करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे उपोषण केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी लोकांना आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची हिंसा अथवा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.