‘लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
पिंपरी (Pclive7.com):- पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ टीमच्या पुढाकारामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या टीमने जर्मनीचा विक्रम मोडीत काढत ‘लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’चा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे उद्या, रविवारी दि. ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या ऐतिहासिक रॅलीला सुमारे ३० हजार सायकलपटू सहभागी होतील, असा दावा आयोजकांनी केला आहे.
इंद्रायणी नदी स्वच्छता आणि संवर्धनासाठी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि परिसरातील पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित केली जाते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ टीमने विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प केला होता. यावेळी आमदार महेश लांडगे, अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे यांच्यासह गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
२०१५ मध्ये जर्मनीमध्ये ‘लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’चा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला होता. त्यानंतर हा विक्रम भारताच्या आणि पर्यायाने पिंपरी-चिंचवडच्या नावावर कोरण्यात आला आहे. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर हा विक्रम स्थापित करण्यात आला.
‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ च्या टीमसाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. गेले दोन महिने आम्ही यासाठी प्रयत्न करीत आहोत. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाल्याचे विशेष समाधान आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उद्या. दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी गावजत्रा मैदान, भोसरी येथून ऐतिहासिक सायकल रॅली निघणार आहे. ५ किमी, १० किमी आणि २५ किमी अशा तीन प्रकारांत रॅली होईल. विजेत्यांना मेडल आणि भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.
– डॉ. निलेश लोंढे, रिव्हर सायक्लोथाॅन टीम.