पिंपरी (Pclive7.com):- महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला अटक केली आहे. त्याने २५ डिसेंबर रोजी मोई येथे ३० लाखांची घरफोडी केली होती. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत दुचाकीच्या चाकावरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आमीर शब्बीर शेख (वय २५, रा. निगडी प्राधिकरण. मूळ रा. वडेश्वर काटे, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते रात्री पावणे दहा वाजताच्या कालावधीत मोई येथे घरफोडी झाली होती. याबाबत नितीन शहाजी कर्पे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चोरट्याने कर्पे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचे ग्रील कापून आत प्रवेश करत घरातून ४७.८ तोळे सोने आणि ५ लाख १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३० लाख ४८ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
या घटनेनंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक दुचाकी संशयितपणे जाताना दिसली. त्या दुचाकीचे चाक लाल रंगाचे होते. त्यानंतर मोई, निघोजे, कुरुळी परिसरात गस्त घालताना पोलिसांना संशयित दुचाकी दिसली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो दुचाकीसह पळून जाऊ लागला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असतात याने कर्पे यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले.
पोलिसांनी आमीर शेख याच्याकडून ४७.८ तोळे सोन्याचे दागिने, ३ लाख रुपये रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण २९ लाख ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार राहू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली आहे.
























Join Our Whatsapp Group