पिंपरी (Pclive7.com):- अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्ताने नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन, गोविंद यशदा चौक याठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा “भव्य सामूहिक महाआरती” सोहळ्याचे अतिउत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले.
सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अश्या मंदिरात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली, आणि “जय श्रीराम” यांच्या नावाने संपूर्ण भारतीयाच्या मुखात हा एकच जयघोष गुंजला. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर याठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा “भव्य सामूहिक महाआरती” सोहळ्याला परिसरातील रामभक्तांनी उत्सवासारखे साजरे केले. अयोध्येत राम लल्ला प्राणप्रतिष्ठेची लगबग सुरु असताना “भव्य सामूहिक महाआरती” सोहळ्यानिमित्ताने सौदागरवासीय विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रभू श्रीराम यांच्या भक्तीत सामावले होते.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी संपूर्ण दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी विजय भिसे यांच्या पृथ्वीराज थिएटर्स मार्फत सुरेल गीत रामायण आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला. तसेच अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी कार्यक्रम स्थळी LED स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर परिसरातील विविध भजनी मंडळींनी रामलल्ला वरील भजन कीर्तन सादर करीत अध्यात्मिक वातावरणाची निर्मिती केली. महिलांच्या सुमारे वीस भजनी मंडळांनी भजन कीर्तन सादर केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसरातील गणेशम २ सोसायटी लेडीज ग्रुपने प्रभू श्रीराम यांच्या गीतावर नृत्य सादर केले. मोहनजी सेंटरच्या लहान मुलांनी हनुमान चालीसा वर डान्स परफॉर्मन्स सादर केला. तर नृत्यर्ष कथ्थक डान्स इंस्टीट्यूट मार्फत राम जीवनावर आधारित पारंपरिक कथ्थक नृत्य सादर केले.
अयोध्येत राम मंदिर आंदोलनाच्यावेळी ज्यांनी बलिदान दिले अश्या कारसेवकांचा सन्मान करण्यासाठी यापेक्षा दुसरा क्षण असू शकत नाही या प्रेरणेने कार सेवकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये महेंद्र शर्मा, विवेक भोसेकर, किसन जाधव आणि दिपक शेंडकर या कार सेवकांना प्रभू श्रीराम यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले गेले. यावेळी या कारसेवकांनी अयोध्येतील या स्वप्नपूर्तीचा आपल्या प्रवासातील चित्तथरारक काही क्षणांचा खुलासा केला. या अलौकिक आणि पवित्र क्षणाचे औचित्य साधून स्वरोपासना ग्लोबल म्युझिक प्रोडक्शन मार्फत निर्मित “चलो अयोध्या नगरी” या गाण्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे प्रक्षेपण करण्यात आले.
हजारो रामभक्त यांच्या उपस्थित रामरक्षा व रामनाम जप पठण तसेच भव्य सामूहिक महाआरती संपन्न झाली. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण करून करोडो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण करीत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल पिंपळे सौदागर मधील रामभक्तांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले. दिवसभर नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन मार्फत रामभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा या क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.
























Join Our Whatsapp Group