पिंपरी (Pclive7.com):- सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि समर्थकांच्या जोरावर भोसरीचे आमदार आणि भाजपाचे सहयोगी सदस्य महेश लांडगे यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत ‘अपक्ष’ मैदान मारले. तेव्हापासून आजपर्यंत तीन वर्षांच्या कालावधीत कोणत्याही राजकीय प्रतिस्पर्ध्यावर जाहीर टीका न करणा-या आमदार लांडगे यांनी पहिल्यांदाच खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जाहीरपणे ‘लक्ष्य’ केले आहे. त्यामुळे भोसरीत विधानसभेचे बिगुल वाजले की लोकसभेचा एल्गार? अशी राजकीय चर्चा जोर धरु लागली आहे.
पिंपरी चिंचवडमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची स्थायी समिती आणि पदाधिका-यांनी पहिल्याच वर्षात समाविष्ट गावांच्या विकासावर भर देण्याचे धोरण ठरवले. त्यानुसार भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत विविध गावांतील रस्ते आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी तब्बल ४२५ कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेण्यात आली. मात्र, या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ केली आहे. त्याद्वारे सुमारे ९० कोटी रुपयांची अनियमितता झाली आहे, असा धक्कादायक आरोप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून केला होता. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यानिमित्ताने आमदार लांडगे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
वास्तविक, ज्या विकासकामांबाबत आरोप झाले ती सर्व कामे भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत होती. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांनीही खासदार आढळराव पाटील यांच्या टीकेला उत्तर देणे अपेक्षीत होते. अगदी तसेच झाले. समाविष्ट गावांच्या विकासाच्या मुद्द्यावरुन आमदार लांडगे यांनी खासदार आढळराव पाटील यांच्यावर टीका करीत खासदार आढळराव यांच्या ‘पोटशूळ’चा उल्लेख केला. वास्तविक, त्या पत्रकार परिषदेत खासदार श्रीरंग बारणे, शहराध्यक्ष राहुल कलाटे, शहर संघटन सुलभा उबाळे आदी स्थानिक नेते होते. मात्र, आमदार लांडगे यांनी खासदार आढळराव पाटील यांनाच ‘टार्गेट’ केले आहे. परिणामी, शिवसेना आणि भाजपा असा वाद न होता केवळ खासदार आढळराव पाटील आणि आमदार लांडगे यांच्यातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला.
विशेष म्हणजे, भोसरीत सुरु असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या बहुतेक स्थानिक नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे स्थानिक नेते आणि आमदार लांडगे यांच्यात कटुता आहे, असे दिसत नाही. मात्र, समाविष्ट गावांच्या मुद्दा आमदार लांडगे यांनी प्रतिष्ठेचा विषय केला. समाविष्ट गावांना न्याय मिळवून देतो…असे आश्वासन विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत देणा-या आमदार लांडगे यांनी तेथील पायाभूत सोयी-सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ४२५ कोटी रुपयांची कामे हाती घेतली. पुढील वर्षभराच्या कालावधीत यातील अनेक कामे पूर्णत्वास येणार आहेत. हा विकासाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. याचा राजकीय फायदा सर्वाधिक महेश लांडगे यांना होवू शकतो. याची जाणीव झाल्यामुळे खासदार आढळराव पाटील यांनी या कामात अनियमितता असल्याचा आरोप केला. या आरोपात तथ्य असेल किंवा नाही. पण, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संपूर्ण निविदा प्रक्रिया पारदर्शी आणि नियमानुसार झाली आहे, असा दुजोरा दिल्याची वस्तुस्थिती आहे. आमदार लांडगे विधानसभा निवडणूक लढवणार की लोकसभेच्या मैदानात उतरणार? यावर पक्षश्रेष्ठींमध्ये खलबते सुरु आहेत. त्यामुळे भोसरीतून सुरू झालेला खासदार-आमदार यांचा थेट संघर्ष म्हणजे विधानसभेचे बिगुल की लोकसभेचा एल्गार? अशी चर्चा रंगली आहे.






















Join Our Whatsapp Group