पिंपरी (Pclive7.com):- वाकडला लागून असलेल्या थेरगावच्या गणेशनगरमध्ये चालू असलेल्या बांधकामाची इमारत एका बाजूला अचानकपणे झुकल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री समोर आला होता. ती इमारत आज (दि.१४) दुपारी १२.२२ वाजता प्रशासनाने अखेर जमीनदोस्त केली आहे.
काल रात्री वाकडला लागून असलेल्या थेरगावच्या गणेशनगरमध्ये मधील बांधकाम सुरू असलेली इमारत एका बाजूला झुकली असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने अग्निशामक दल व पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल करत परिसर रिकामा केला होता. हे बांधकाम वाय पद्धतीचे म्हणजेच चार ऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आल्यानं अशी परिस्थिती उदभवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या इमारतीचे मालक सुनील दोलवानी हे असून आर्किटेक्ट मल्लिकार्जुन आंबेगावे हे आहेत. तळमजला अधिक तीन मजले या बांधकाम पद्धतीवर उभारणे जीवघेणे ठरणार, असा निष्कर्ष रात्री काढण्यात आलेला होता.
आता ही झुकलेली इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. काल रात्री ही इमारत झुकल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले होते. मात्र प्रशासनाने वेळेत घटनास्थळी धाव घेऊन या इमारतीला जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने सपोर्ट दिला होता. आता ही इमारत प्रशासनाने जमीनदोस्त केली आहे. दरम्यान याप्रकरणी या इमारतीचा मालक तसेच आर्किटेक यांच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.