मुंबई (Pclive7.com):- भाजपाने राज्यसभा उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊ केली आहे. तर ज्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, त्या पकंजा मुंडेंना मात्र यावेळी वगळण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच (१३ फेब्रुवारी) भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्या काहीशा नाराज होत्या. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडेही आपली तक्रार नोंदविली होती. आज राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकप्रकारे त्यांचे पुर्नवसन केल्याचे दिसत आहे.
नांदेडमधून भाजपाने दोन उमेदवार दिले आहेत. डॉ. अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण हे दोन्ही नेते नांदेड जिल्ह्यातील आहेत.
डॉ. अजित गोपछडे नेमके आहेत तरी कोण..?
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले डॉ. अजित गोपछडे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा संघटनेत काम करत आहेत. याआधी २०२० साली त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी घोषित केली होती. मात्र ऐनवेळी पक्षानेच त्यांची उमेदवारी मागे घेऊन रमेश कराड यांचे नाव पुढे केले होते. अजित गोपछडे हे डॉक्टर आहेत.
सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये उमेदवार मिळाला?
सरकारमध्ये मंत्री असलेल्या नारायण राणेंना पुन्हा संधी देण्यात आलेली नाहीये. यामुळे नारायण राणे आता लोकसभेची तयारी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. नारायण राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
























Join Our Whatsapp Group