पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक १०७ मिटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी १० वाजता भक्तीशक्ती येथे होणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली भक्ती शक्ती चौक, निगडी येथे होणा-या या कार्यक्रमास पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, कॅन्टोनमेंट बोर्डाचे स्पेशल कमांडंट, प्रेसिडंट, ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णवी, विरचक्र सन्मानित, महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांच्यासह सर्व नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत.
भारताच्या राष्ट्रध्वजाबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळे आदराचे स्थान आहे. ही भावना नविन पिढीच्या मनात रुजत राहण्याच्या दृष्टीने तसेच देशा प्रती प्रेम व्यक्त करण्याकरीता भक्ती शक्ती उद्यानाच्या आवारात १०७ मिटर उंचीवर दिवस रात्र फडकणा-या राष्ट्रध्वजाच्या कापडाचे मोजमाप १२० फुट X ८० फुट आहे. या पूर्वी १०५ मिटर उंचीचा राष्ट्रध्वज अटारी येथील वाघा सिमेजवळ उभारण्यात आलेला आहे. या कामास केंद्रीय गृह खात्याची परवानगी ११ जुलै २०१७ रोजी प्राप्त झाली आहे. तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे यांनी या प्रकल्पाच्या फाऊंडेशनच्या डिझाईनला मंजुरी दिली आहे.
२६ जानेवारी रोजी भक्ती शक्ती चौक, निगडी येथे सकाळी १० वाजता ध्वजारोहण, सामुहिक संविधान वाचन व राष्ट्रगान होणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group