पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आज (दि.२२) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने भव्य मिरवणूक काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी आकुर्डी खंडोबा माळ येथून पीएमआरडीए कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, रामशेठ ठाकूर, आरपीआयचे नेते चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. चिंचवड, पिंपरी, मावळ, कर्जत-खालापूर, पनवेल व उरण या सहाही विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते आकुर्डी येथे दाखल झाले होते.