पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. श्रीरंग बारणे यांच्या विरोधात आम्ही प्रचार करून भाऊ पार्थ पवार याचा बदला घेणार आहे. अजित पवार हे पार्थ पवार याचा झालेला पराभव विसरले असतील आम्ही अद्यापही त्याचा पराभव विसरलो नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. रोहित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, संजोग वाघेरे यांच्या बाजूने आजचे वातावरण आहे. वाघेरे हे नवीन खासदार असतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, अजित पवार हे शरद पवार यांना वडील मानायचे. त्यांना सोडून स्वतःच साम्राज्य आणि कारवाईपासून लपून राहण्यासाठी महायुती आणि भाजपसोबत अजित पवार गेले आहेत. अजित पवारांनी वडिलांचा विचार केला नाही.
पुढे ते म्हणाले, ज्या व्यक्तीने मुलाचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्या गोष्टी विसरून ज्या उमेदवाराने पराभव केला त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार येत असतील तर यावरूनच अजित पवारांची परिस्थिती कळून येत आहे. अजित पवार हे या सर्व गोष्टी विसरले असतील. मला पार्थला सांगायचं आहे. या गोष्टी मी विसरलो नाही. ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला. त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी तुझा भाऊ इथं आलेला आहे असं शेवटी बोलताना ते म्हणाले.