पुणे (Pclive7.com):- पुण्यातील कल्याणीनगर परिसरात वेदांत अगरवाल याने शनिवारी मद्यपान करून बेदरकारपणे पोर्शे कार चालवून तरुणीसह दोघांना चिरडले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र गुन्हा दाखल होताच अगरवाल फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तपास वेगाने करत संभाजीनगर येथून विशाल अगरवाल यांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पब मालक आणि मॅनेजरलाही अटक केली आहे.
अपघातानंतर विशाल अगरवाल फरार झाले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नारळीबाग परिसरातील जेपी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये अगरवाल यांनी तीन खोल्या बुक केल्या होत्या. त्याचे चालक चतुर्भुज डोलस आणि अगरवाल यांचे मित्र राकेश पौडवाल आलिशान हॉटेलमध्ये थांबले होते. तर अगरवाल रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये थांबले होते. तिथेच ते लपून बसल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. स्थानिक पोलिसांनी तिथे छापा टाकला असता चालक चतुर्भुज डोलस आणि अगरवाल यांचे मित्र राकेश पौडवाल यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अगरवाल दुसऱ्या हॉटेलमध्ये राहत असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी संभाजीनगर येथून त्यांना अटक केली.
वेदांत अल्पवयीन असून त्याला पबमध्ये प्रवेश दिल्याबद्दल आणि त्याला व त्याच्या मित्रांना दारू पाजल्याबद्दल या अपघाताप्रकरणी मुंढव्यातील मॅरियट स्वीट्स आणि कोझी हॉटेलचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर यांच्यासह ब्लॅक हॉटेलचे व्यवस्थापक संदीप सांगळे आणि बार काउंटरचे कर्मचारी जयेश बोनकर यांना गुन्हे शाखेने अटक केली असून, तत्काळ कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत या घटनेशी संबंधित दोन एफआयआर नोंदवले आहेत. या अपघाताचा तपास खडकीचे सहाय्यक पोलीस आयुक्त करीत आहेत, तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दुसऱ्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.


























Join Our Whatsapp Group