चिंचवड (Pclive7.com):- राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना माझं काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनंतर आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी माझं काम केलं. मात्र राष्ट्रवादीचा जो खालचा कार्यकर्ता आहे, त्याने महायुतीचा धर्म पाळला नाही आणि काही ठिकाणी माझं काम केलं नाही. या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली असून या निवडणुकीत दोन लाख ५० हजारांच्या मताधिक्याने विजय होणार असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या १०० टक्के कार्यकर्त्यांनी माझं काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिटही वाचलं नसतं, असा विश्वासही बारणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
श्रीरंग बारणे यांनी आज प्रसार माध्यमाची संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजितदादा गटाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केले. पण काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. नेत्यांचे आदेश पाळले नाहीत. ज्यांनी काम केले नाही, त्यांची यादी मी अजित पवारांकडे दिली असल्याचे सांगून मी शंभर टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला. मागील दोन्ही निवडणुकीत माझा अंदाज खरा ठरला आहे. बूथनिहाय मी अंदाज काढला आहे. त्यानुसार पनवेल, उरण, कर्जत, चिंचवड, पिंपरी आणि मावळ या सहाही विधानसभा मतदारसंघात मला मताधिक्य मिळेल. मी शंभर टक्के निवडून येणार आहे. 2 लाख 50 हजार 374 मतांनी मी विजयी होईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या 3 लाख 22 हजार 700 मतांपैकी मला 2 लाख 5 हजार 683 मते पडतील. पनवेल विधानसभा मतदारसंघात 2 लाख 95 हजार 973 मतदान झाले. त्यापैकी 1 लाख 76 हजार मतदान मला पडेल. या दोन मतदारसंघांमध्ये मिळालेला लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही, असा दावा श्रीरंग बारणे यांनी केला.
























Join Our Whatsapp Group