पिंपरी (Pclive7.com):- मतमोजणी हा निवडणूक प्रक्रियेतील अंतिम टप्पा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात ४ जून रोजी होणारी मतमोजणी प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे आणि मार्गदर्शक सुचनांचे तंतोतत पालन करुन पारदर्शक आणि शिस्तबद्ध, शांततापूर्ण वातावरणात तसेच विहीत वेळेत पार पाडण्यासाठी सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, असे निर्देश मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिले.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातंर्गत मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पहिले मतमोजणी प्रशिक्षण सत्र आज पार पडले. या प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शन करताना मावळ लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला बोलत होते. यावेळी पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभानिहाय नियुक्त करण्यात आलेले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, अजित नैराळे, जनार्दन कासार, सुरेंद्र नवले, विठ्ठल जोशी, अर्चना यादव, मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिम्मत खराडे, निवडणूक समन्वयक अभिजीत जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, मनिषा तेलभाते, मनुष्यबळ कक्ष समन्वयक राजू ठाणगे, ईव्हीएम कक्ष समन्वय अधिकारी बापूसाहेब गायकवाड, क्षेत्रीय समन्वय अधिकारी अजिंक्य येळे, कर्मचारी व्यवस्थापन समन्वय अधिकारी किरणकुमार मोरे, प्रशिक्षण व्यवस्थापन समन्वय अधिकारी शिरीष पोरेडी, मास्टर ट्रेनर गोरखनाथ घोलप, संजय खोमणे, शशिकांत ऐवळे तसेच पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
४ जून २०२४ रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे. येथे सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून या निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले.
मतमोजणी प्रक्रिया अत्यंत महत्वाची तसेच संवेदनशील असते. ही प्रक्रिया नि:पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक यंत्रणेची असते. यामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत जबाबदारीची आणि महत्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिले. तसेच मतमोजणी प्रक्रिया सर्वांच्या समन्वयाने निश्चितपणे शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मतमोजणी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली पार पडेल. सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणीबाबत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे अनिवार्य आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने कायदेशीर तरतुदी, मतमोजणी कर्तव्यावर नेमलेल्या विविध अधिकारी कर्मचाऱ्यांची भूमिका, विधानसभा मतदारसंघनिहाय टेबल व एकूण फेऱ्यांची संख्या, मतमोजणी कक्षाची रचना, मतमोजणी टेबलची रचना, मतमोजणीकरिता आवश्यक साहित्य, ईव्हीएम यंत्रामधील मतांची मोजणी, मतमोजणी सुरू करण्यापुर्वी सील कंट्रोल युनिट उघडण्याची प्रक्रिया, ईव्हीएम मतमोजणी कार्यप्रवाहाचे टप्पे, निवडणूक निरीक्षकांच्या टेबलवरील मतमोजणी, सुक्ष्म निरीक्षकांची जबाबदारी आणि कर्तव्ये, मतमोजणी दरम्यान येणाऱ्या अडचणी, निवडणूक घेण्याबाबत नियम १९६१ याचा नियम ५६ ड तरतूदी, व्हीव्हीपॅट स्लीपची मोजणी, विशेष दक्षता घ्यावयाच्या बाबी, मतमोजणीनंतर कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट तसेच कागदपत्रे सीलबंद करण्याची प्रक्रिया अशा विविध बाबींबद्दल विस्तृत मार्गदर्शन या प्रशिक्षण सत्रामध्ये करण्यात आले. तसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणीचे प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या अधिपत्याखाली मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण १ हजार ५३० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे आवश्यक मतमोजणी प्रशिक्षण पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.