पिंपरी (Pclive7.com):- शहरात येणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळवता आलेलं नाही. या तीनही मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना जास्त मतदान झाले आहे. असे असले तरी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून चिंचवड आणि पिंपरी या दोन जागांवर दावा ठोकण्यात आला आहे. तर भोसरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जागा देण्यात यावी अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत यश संपादन केलं. त्याच अनुषंगाने शहरातील चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटावा अशी मागणी करत आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा वर्ग, मतदार मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रवादीची ताकद या मतदार संघात असल्याचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील लक्षात येईल.
दरम्यान या लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पूर्ण ताकद लावली होती. म्हणून नैतिकतेच्या दृष्टीने भोसरी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केले आहे. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत पिंपरीसह चिंचवड विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विजय आम्ही निश्चितच घेचून आणू असा विश्वास तुषार कामठे यांनी व्यक्त केला आहे.