पिंपरी (Pclive7.com):- गुंडाविरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पाच सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये खुनाच्या तसेच गोळीबार प्रकरणातील आरोपींचा समावेश आहे. आरोपींकडून चार पिस्तूल आणि बारा जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत.
विवेक उर्फ विकी राजेश खराडे (२०, रा. रामलिंग रोड, कामाठीपुरा, शिरुर), पांडुरंग उर्फ पांडा बालाजी कांबळे (२४, रा. रामलिंग, तुकाईमळा, ता. शिरूर), रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २२), अनिकेत सतीश काजवे (२८, दोघे रा. प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी), तुषार ऊर्फ गोल्या रामराव राठोड (२६, रा. तापकीरनगर, गजानन महाराज मंदिरा जवळ, आळंदी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

दोघे नवी मुंबईतून जेरबंद..
सहायक निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे सव्वा महिन्यापूर्वी सहा ठिकाणी हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील मुख्य आरोपी फरार होते. दरम्यान, आरोपी नवी मुंबई येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने विवेक खराडे आणि पांडुरंग कांबळे यांना नवी मुंबईतून जेरबंद केले. आरोपींकडून पथकाने दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
या प्रकरणात गुंडा विरोधी पथकाने यापूर्वी रोहन शिंदे, नीरज उर्फ दाद्या बाबू पवार व आदित्य नितीन भोईनल्लू यांना अटक केली आहे. आरोपींनी आपसात संगनमत करुन २० जून रोजी तळेगाव दाभाडे येथे सहा ठिकाणी हवेत अंदाधुंद गोळीबार केला होता.
सांगवीतून दोघांना अटक..
अटक आरोपींकडे चौकशी केली असता सांगवी परिसरात आणखी अवैध शस्त्रे असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने जुन्या सांगवीतील प्रियदर्शनीनगर ते ममतानगर रस्ता येथून रोहित धर्माधिकारी, अनिकेत काजवे (२८, दोघे रा. प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
फरार आरोपीला बेड्या..
चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पथकाने अटक केली आहे. तुषार ऊर्फ गोल्या रामराव राठोड (२६, रा. तापकीरनगर, गजानन महाराज मंदिराजवळ, आळंदी) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी तुषार हा एचपी चौकाजवळ, म्हाळुंगे या परिसरात असल्याबाबत माहिती मिळाली होती. चाकण येथील साईआंगण लॉज येथून त्याला जेरबंद केले.
ही कारवाई उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हरिष माने, फौजदार अशोक जगताप, हजरत पठाण, प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, नितीन गैंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहीते, तौसिफ शेख, नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली.






















Join Our Whatsapp Group