चिखली (Pclive7.com):- हॉटेल बंद झाल्यानंतर रात्री उशिरा आलेल्या चौघांनी हॉटेल मधील वेटरला जेवण मागितले. जेवण संपले असून हॉटेल बंद झाल्याचे वेटरने सांगितले. याचा राग आल्याने चौघांनी मिळून हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली. तसेच, तुझे हॉटेल कसे चालते तेच पाहतो, अशी धमकी दिली.

ही घटना मंगळवारी देहू-चिखली रोडवर शेलारवस्ती येथील हॉटेल मार्तंड येथे घडली. पप्पू शेलार, वैभव शेलार (दोघे रा. शेलारवस्ती, चिखली) आणि त्यांचे दोन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोविंद दगडू सातपुते यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे देहू-चिखली रस्त्यावर शेलारवस्ती येथे हॉटेल मार्तंड नावाने हॉटेल आहे. दरम्यान, आरोपी मंगळवारी रात्री बारा वाजता हॉटेलमध्ये आले. त्यांनी वेटर लक्ष्मण याला जेवण मागितले. लक्ष्मण याने जेवण संपले असून हॉटेल बंद झाल्याचे आरोपींना सांगितले. त्यावरून आरोपींनी हॉटेल मधील वेटर लोकांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत वेटर यांनी फिर्यादी सातपुते यांना माहिती दिली.
सातपुते यांनी हॉटेल मध्ये जाऊन आरोपींना समजावून सांगितले. त्यानंतर आरोपींनी सातपुते यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. हॉटेल मधील खुर्ची सातपुते यांच्या पाठीत मारली. ‘तू कुठे जायचे तिथे जा. तुझे हॉटेल कसे चालते तेच पाहतो’ अशी आरोपींनी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.






















Join Our Whatsapp Group