सांगवी (Pclive7.com):- कारमधून प्रवास करताना महिलेचे आठ तोळे सोने असलेली पर्स रस्त्यात गहाळ झाली. याबाबत सांगवी पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी अवघ्या २४ तासांत महिलेने प्रवास केलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून सोने परत मिळवून दिले.

याबाबत माहिती अशी की, २४ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता २२ वर्षीय महिला कारमधून सांगवी परिसरातून जात होती. पिंपळे गुरव मधील जवळकरनगर येथे कारमधून उतरून पाण्याची बाटली घेतली आणि पुन्हा कारमध्ये बसून ती निघून गेली. दरम्यान तिचे आठ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स रस्त्यात पडली.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर तिने सांगवी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्परता दाखवत तिने ज्या मार्गावरून प्रवास केला आहे, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. जवळकरनगर येथील कल्पतरू सोसायटी जवळ पाण्याची बाटली घेताना दागिने असलेली पर्स पडल्याचे त्यात आढळले. त्यानंतर पोलिसांनी ती पर्स कोणीतरी उचलल्याचे पाहिले आणि त्या व्यक्तीचा माग काढला. पर्स उचललेली व्यक्ती कारमधून निघून गेली होती. कारच्या क्रमांकावरून पोलिसांनी व्यक्तीचा ठावठिकाणा शोधला आणि त्याच्याशी संपर्क केला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केला असता त्या व्यक्तीने सापडलेले दागिने परत आणून दिले. ते दागिने सांगवी पोलिसांनी संबंधित महिलेला परत केले.






















Join Our Whatsapp Group