पिंपरी (Pclive7.com):- घटनास्थळ पंचनाम्यावर सही करण्यास नकार दिल्याने शासकीय लोकसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि.१) सायंकाळी पिंपरी पोलिस ठाण्यात करण्यात आली.

विठ्ठल हरिदास आव्हाड (४३, रा. गौतमनगर, पिंपरी), असे गुन्हा दाखल झालेल्या शासकीय लोकसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुहास आव्हाड यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बीएनएस कायदा कलम २१५, २२२, २२३ अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल आव्हाड हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे कर्मचारी आहेत. महाराष्ट्र शासन निर्णय अन्वये सरकारी कार्यात मदत करणे बंधनकारक असल्याचे समजून सांगून तसेच त्यांच्या कार्यालयाकडून घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी लेखी आदेश असतानाही विठ्ठल आव्हाड यांनी घटनास्थळ पंचनाम्यावर सही करण्यास नकार दिला. लोकसेवक असूनही त्यांनी पंचनाम्यावर सही केली नाही. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group