चिंचवड (Pclive7.com):- पुनावळे येथील सोसायटीत पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयला सर्व्हिस लिफ्टचा वापर करण्यास सुरक्षारक्षकाने सांगितल्याच्या कारणावरून डिलिव्हरी बॉयने त्याच्या २०-२५ साथीदारांसह तेथे राडा घातला. या टोळक्याने सुरक्षारक्षकासह चौघांना दांडके, दगडाने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.७) सकाळी साडेअकराच्या सुमारास पूना व्हिले सोसायटीत घडली. सुरक्षारक्षक मोहम्मद अश्रफ मोहम्मद शफी (२७, रा. पुनावळे, मूळ रा. जम्मू-कश्मिर), सुपरवायझर प्रभाकर पांडे, एरिया सुपरवायझर ज्ञानदेव भोगील, सुरक्षारक्षक मेहबूब शेख अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद शफी यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी आरोपी मारुती परसराम वराडे (२०, रा. जांबे, ता. मुळशी), केदार जितेश बनसोडे (१९, रा. वाकड), गोपाल सिद्धेश्वर बोरावडे (२६, रा. पुनावळे), प्रियंकसिंग सुरेंद्रसिंग तोमर (२३, रा. हिंजवडी), रजाक इर्शाद खान (२५, रा. देहूरोड), सुनील विठ्ठल गवळी (२०, रा. जांबे, ता. मुळशी), सुनील सिद्ध बोधणे (२०, रा. मामुर्डी, ता. मावळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याव्यतिरिक्त राहुल गोपाळ बोरावडे यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मारुती वराडे हा झेप्टो कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. शनिवारी सकाळी तो पूना व्हिले सोसायटीत पार्सल देण्यासाठी आला. त्यावेळी तिथे नेमणुकीस असलेले सुरक्षारक्षक फिर्यादी शफी यांनी त्यास पॅसेंजर लिफ्टचा वापर न करता सर्व्हिस लिफ्टचा वापर करण्यास सांगितले. याकारणावरून आरोपी वराडेने चिडून त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. आज याला संपवूनच टाकतो, असे म्हणून दोघांनी फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. इतर पाच ते सहा जणांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी सुपरवायझर पांडे आले असता त्यांना देखील आरोपींनी दगडाने, लाथाबुक्क्यांनी तसेच एरिया सुपरवायझर ज्ञानदेव भोगील व सुरक्षारक्षक मेहबूब शेख यांना देखील १५ ते २० जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिस उपनिरीक्षक राहुल खिळे तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group