वाकड (Pclive7.com):- पिंपरी- चिंचवडमध्ये ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी अज्ञात व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वाकड येथील फिनिक्स मॉलच्या गेट नंबर ८ वर घडली आहे. या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली आहे. एकीकडे गणपती विसर्जन असल्याने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडली आहे. सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरू महामार्गालगत वाकड येथे असलेल्या फिनिक्स मॉल गेट नंबर ८ येथे काही काम सुरू आहे. सव्वा सहाच्या सुमारास चारचाकीतून आलेल्या अज्ञात व्यक्तीने अविनाश नावाच्या कामगाराला भेटून त्याच्यासोबत संवाद साधला. तो गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अद्याप गोळीबार करणारा व्यक्ती कोण आहे? त्याने गोळीबार का केला? याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याचा तपास वाकड पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. परंतु, गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे पोलिसांची मात्र धावपळ झाली आहे. आधीच गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा शहरात दाखल झालेला आहे.