पिंपरी (Pclive7.com):- ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांनी सजवलेले रथ, गणपती बाप्पा मोरयाच्या अखंड जयघोषात पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. दुपारी चार वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली. शहरातील विविध भागात सकाळी सुरू झालेल्या ह्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील शगुन चौक, चिंचवडमधील चापेकर चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, उपायुक्त स्वप्ना गोरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते.
पिंपरी गाव येथील मित्र सहकार्य तरुण मंडळाच्या नवसाचा महागणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी बारा वाजता सुरू झाली. यावेळी प्रभू श्री राम यांची मूर्ती असलेला रथ सर्वांचेच लक्ष वेधत होता. या मिरवणुकीत मातृभूमी ढोल ताशा पथकाने नागरिकांची मने जिंकली. चिंचवड आनंदनगर येथील गिरीजात मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर आठच्या सुमारास आनंदनगर मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक चौकात दाखल झाली. त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचा रथ साकारला होता. बालवारकरी, संबळवादक सहभागी झाले होते.
श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या मिरवणुकीत आरंभ ढोल ताशा पथक , बालवारकरी सहभागी झाले होते. विठ्ठलाचा रथ साकारला होता. तरुण मित्र मंडळाने भंडाऱ्याची उधळण करत पालखीतून मिरवणूक काढली. गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या मिरवणुकीत शिवदर्शन ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. श्रीराम मोरया दरबार देखाव्याचा चित्ररथ साकारला होता. मुंजोबा मित्र मंडळाने शिवपार्वती रथ साकारला होता. काळभैरवनाथ मित्र मंडळाने ‘रामरथ’ साकारला आहे. ‘पवनामाई आमची माता, आम्हीच तिचे रक्षणकर्ता’ असे मजकूर असलेला फलक लावता नदी संवर्धनाचा संदेश दिला. गजाक्ष ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. ज्ञाप्रबोधिनीच्या १५० मुलांच्या ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले.