भोसरी (Pclive7.com):- पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत भोसरी विधानसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. गेल्या १० वर्षापासून सत्तेत असूनही भोसरीसह समाविष्ट गावांची पाणी समस्या ते सोडवू शकले नाहीत, हे तर भाजपा आमदारांचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजित गव्हाणे यांनी केली आहे.

अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे की, भोसरी मतदारसंघात भाजपा आमदारांकडून दहा वर्षात कोणत्याही प्रकारचे असे ठोस काम झालेले नाही. मूलभूत असा पाण्याचा प्रश्न देखील त्यांना सोडवता आला नाही. भोसरीसह समाविष्ट गावे आजही पाणी समस्येंना तोंड देत आहे. आज पाण्याचा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात भेडसवतो आहे, त्याच कारण म्हणजे भाजपा आमदारांचे अपयश आहे. यांना भामा-आसखेड आणि आंध्रा धरणाचं जे मंजूर 267 MLD पाणी होते ते देखील आपल्या शहरात यांना आणता आले नाही. एकाच वेळी पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला पाणी मंजूर झाले होते. दरम्यान पुणे महापालिकेने बंद पाईप लाईनने पाणी आपल्या शहरातून पुणे शहरातील वाघोली आणि वडगावच्या भागात बंद पाईपने नेले. आज याला दोन वर्षाहून अधिक काळ झाला आहे. मात्र यांनी आजही हे काम अर्धवट अवस्थेत ठेवले आहे.

आता हे चिखली आणि तळवडे परिसरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट करून पाणी उचलत आहेत. आणि ते पाणी आज आपल्याला द्यायचा प्रयत्न केला जात आहे. सांगताना ते १०० MLD पाणी देत असल्याचे सांगत आहेत. परंतु प्रत्यक्षात आमच्या माहितीप्रमाणे ४० MLD पाणी देखील आपल्याला मिळत नाही. त्यामुळे भोसरी मतदार संघात पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून याला भाजपा आमदार जबाबदार असून गेल्या १० वर्षात हा प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले असल्याचा आरोप अजित गव्हाणे यांनी केला आहे.