पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाना काटे आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष लढणारे राहुल कलाटे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर महाविकास आघाडीतून शरद पवार गटाकडून राहुल कलाटे यांची आज उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शंकर जगताप विरुद्ध शरद पवार गटाचे राहुल कलाटे असा सामना रंगणार आहे. तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भोसरीमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे विरुद्ध शरद पवार गटाचे अजित गव्हाणे अशी चुरस होणार आहे.
चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून चर्चा सुरू होती. चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात चुरस होती. भोसरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे रवी लांडगे, सुलभा उबाळे आणि अजित गव्हाणे यांचं नाव स्पर्धेत होतं. अखेर तिसऱ्या यादीत चिंचवड मधून राहुल कलाटे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे विरुद्ध ठाकरे गटाचे अजित गव्हाणे असा सामना रंगणार आहे.
तर दुसरीकडे बहुचर्चित चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शंकर जगताप विरुद्ध राहुल कलाटे असा सामना होणार आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे राहुल कलाटे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट डावलत होता. परंतु, खासदार अमोल कोल्हे यांच्या मध्यस्थीने कलाटे यांना उमेदवारी मिळाल्याचे बोलले जात आहे.