मुंबई (Pclive7.com):- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंनी राजीनामा सुपूर्द केला आहे.
राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपणार आहे. 26 नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र नवे मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते नवं सरकार स्थापन होईपर्यंत कारभार संभाळणार आहेत.
मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना विधानसभेचा पंच वार्षिक कार्यकाळ संपलेला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते. मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील अशी माहिती समोर येत होती. त्याप्रमाणे सकाळी साडे दहापासूनच घडामोडींना सुरुवात झाली. सर्वात आधी ‘देवगिरी’ बंगल्यावरुन अजित पवार निघाले आणि राजभवनामध्ये दाखल झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या ‘सागर’ बंगल्यावरुन राजभवनावर दाखल झाले. सर्वात शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवानात दाखल झाले. तिन्ही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर शिंदेंनी राजीनामा दिला. शिंदेंनी राजीनामा दिल्याने आता पुढील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून ही तांत्रिक बाब असली तर सत्ता स्थापनेसाठी फार महत्त्वाची घडामोड आहे.