पिंपरी (Pclive7.com):- नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना लोकल पकडण्याच्या नादात महिला प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये पाय घसरून पडली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या दोन लोहमार्ग पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला ओढून बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचविले. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजता चिंचवड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर ३ वर घडली.
नीता संजय गंगावणे (वय ३१ रा. पनवेल) असे या महिलेचे नाव आहे.
नीता गंगावणे या पती संजय आणि मुलगा सिद्धार्थ सोबत चिंचवडला आल्या होत्या. हे तिघे दुपारी पुणे लोणावळा लोकलने देहूरोज येथे जाण्यासाठी चिंचवड रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. दुपारी साडेबाराची लोकल चिंचवड रेल्वे स्थानकावर आली. स्थानकावर गर्दी असल्याने त्यांनी लोकल पडण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दी असल्याने त्यांना गाडी पकडता आली नाही आणि त्यांचा पाय घसरला. नीता यांचा पाय प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये असलेल्या फटीत गेला. त्या रेल्वे खाली येणार तेवढ्यात स्थानकावर उपस्थित असलेल्या पुरुषोत्तम कर्दळे आणि अनिल बागुल या दोन लोहमार्ग पोलिसांनी नीता यांना बाहेर ओढून काढले. थोडाजरी उशीर झाला असता तर नीता या रेल्वे खाली आल्या असत्या.
दैव बलवत्तर म्हणून नीता गंगावणे यांचे प्राण वाचले. स्थानकावर असलेल्या अनेकांनी हा थरार आपल्या डोळ्यांनी पहिला. लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नीता यांचे प्राण वाचले. प्रवाशांनी आणि नीता गंगावणे यांनी कर्दळे आणि बागुल यांचे आभार मानले.






















Join Our Whatsapp Group