पुणे (Pclive7.com):- पोलिसांच्या सोबतीने अंमली पदार्थ शोधणे, घातपाती कारवायांची तपासणी आदींमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांच्या शूर शिपायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पुणे पोलिसांच्या श्वान पथकातील श्वान ‘लिओ’चे निधन झाले. ‘लिओ’च्या निधनामुळे गुन्हे शाखेतील विशेषत: श्वान पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या शरीरावर तिरंगा झेंडा गुंडाळण्यात आला होता. तर, पोलिसांनी त्याला अंत्यसंस्कारापूर्वी मानवंदना देखील दिली.
श्वान लिओ हा लॅब्राडोर जातीचा श्वान होता. त्याचा जन्म २० जुलै २०१६ रोजी झाला होता. त्याचा २० सप्टेंबर २०१६ रोजी पुणे पोलीस दलात प्रवेश झाला. त्याला अंमली पदार्थ शोध घेण्यासाठीचे प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले. ‘लिओ’ने २८ डिसेंबर २०१९ रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये पोलिसांसोबत कामगिरी बजावली होती. एका नायजेरीयन व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोन व ५० किलो गांजा पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतामधून ७० किलो गांजा पकडून देण्यातही मोठी भूमिका बजावली होती.
यासोबतच विविध रेल्वे स्थानके, बस स्थानके, येरवडा कारागृह येथे नियमित तपासणी करून अंमली पदार्थांचा शोध घेऊन त्याचा छडा लावण्याचे काम केले. तसेच, भारतीय लष्कराच्या जवानांकरिता डेमो प्रात्यक्षिके, विविध शाळांमध्ये प्रात्यक्षिके श्वान लिओ याने सादर केली होती. त्याला अन्ननलिकेचा आजार जडला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याचा मंगळवारी मृत्यू झाला.
महापालिकेच्या पशू दाहिनीमध्ये करण्यात आलेल्या अंतिम संस्कारावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त, एमओबीचे पोलीस निरीक्षक, श्वान पथकाचे अधिकारी व कर्मचारी, सलामी गार्ड उपस्थित होते.