पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील महायुतीचा विजय हा भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कणखर व प्रेरणादायी नेतृत्वामुळे शक्य झाला. पक्षाने बूथ स्तरावर ५१ टक्के मतांचे उद्दिष्ट दिलेले असताना पक्षाच्या बूथ, मंडल व जिल्हा स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यापेक्षा कितीतरी जास्त मते मिळवत निर्विवाद विजय मिळवला व भाजपच्या वर्चस्वाची पावती दिली, असे मत पिंपरी-चिंचवड शहरातील महायुतीचे समन्वयक सदाशिव खाडे यांनी व्यक्त केले.
शहरातील निवडणूक निकालांचे विश्लेषण करणारा अहवाल खाडे यांनी नुकताच पक्षच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविला आहे. शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून गेल्या दीड वर्षात शंकर जगताप यांच्या सूक्ष्म नियोजन, आहोरात्र मेहनत आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या विश्वासामुळे महायुतीला विजय प्राप्त झाला. याच कारणामुळे त्यांचे नेतृत्व हे महत्त्वपूर्ण ठरले, ज्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात महायुतीचा विजय निर्विवाद आहे, असे खाडे यांनी अहवालात म्हटले आहे.
चिंचवड मतदारसंघाचा विक्रमी विजय
चिंचवड मतदारसंघात भाजपचे शंकर जगताप यांनी २,३५,३२३ मते मिळवून १,०३,८६५ मतांची लक्षणीय आघाडी मिळवली. यामुळे, त्यांनी राज्यातील सर्वाधिक मते मिळवणाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या मतांची टक्केवारी ६०.७३% आहे, ही शंकर जगताप यांच्या प्रभावी कार्याची आणि जनतेच्या विश्वासाची साक्ष आहे, असे खाडे यांनी म्हटले आहे.
भोसरी मतदारसंघातील हॅटट्रिक
भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे यांनी विजयाची हॅटट्रिक केली. २,१३,६२४ मते मिळवून त्यांनी ६३,७६५ मतांच्या फरकाने विरोधकांवर मात केली. त्यांनी मिळवलेली ५७.१% मते ही त्यांच्या लोकप्रियतेची, केलेल्या कामाची पावती म्हणावी लागेल. त्याच बरोबर शंकर जगताप यांच्या नियोजनामुळेही भोसरीत पक्षाला मोठा विजय मिळवता आला, असे खाडे यांनी अहवालात नमूद केले आहे.
पिंपरी मतदारसंघातील भाजपचे प्रभावी काम
पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे १,०९,२३९ मते मिळवून विजय मिळवला. झालेल्या मतदानापैकी सुमारे ५४ टक्के मते बनसोडे यांना मिळाली. या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी असून ती बनसोडे यांच्या मागे उभी करण्यात शंकर जगताप यांची भूमिका निर्णायक ठरली, असे खाडे यांनी म्हटले आहे.
मतदानवाढीचा परिणाम
चिंचवड, भोसरी आणि पिंपरी येथील मतदानात एकूण १% ते १.५% वाढ झाली, ज्याचे श्रेय महायुतीच्या प्रभावी मतदान व्यवस्थापनाला आहे. चिंचवडमध्ये ३.०७% जास्त मतदान झाले, तर भोसरीत १.४३% आणि पिंपरीत १.०१% जास्त मतदान झाले. या वाढीमुळे महायुतीला ८०% मतदानाचे लाभ मिळाले, त्यांचा परिणाम म्हणून महायुतीला निर्णायक विजय मिळाला, असे विश्लेषण खाडे यांनी केले आहे.
शंकर जगताप यांचे नेतृत्व कौशल्य
शंकर जगताप यांनी निवडणूक योजनेतील प्रत्येक गोष्टीवर विशेष लक्ष दिले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि सक्रियता निर्माण केली. नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र करून, सर्व घटकांना जोडून एकत्रितपणे काम केले. शंकर जगताप यांच्या संघटन कौशल्यामुळे झोपडपट्ट्यांपासून उच्चभ्रू सोसायट्यांपर्यंत प्रत्येक मतदार वर्गापर्यंत पोहोचता आले, असे निरीक्षण खाडे यांनी नोंदविले आहे.