पुणे (Pclive7.com):- बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत.
या व्हिडीओत ते म्हणाले, “मी वाल्मिक कराड आहे. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण होत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे.”