पिंपरी (Pclive7.com):- बावधन पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवाया करत पाच जणांना अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, सहा कोयते, एक गुप्ती अशी शस्त्रे जप्त केली आहेत.
आदेश राम टेमकर (२४, रा. सुसगाव, पुणे), सुमित संजय करेकर (रा. लवळे, पुणे), गणेश ऊर्फ गुड्या अनिल पाटेकर (२३, रा. शिवणे, पुणे), केशव त्र्यंबक काळे (रा. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जानेवारी रोजी बावधन पोलिसांनी रात्र गस्ती दरम्यान एक कार ताब्यात घेतली. कारमधून एक पिस्तूल, एक काडतूस आणि गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणात केशव काळे याला अटक करण्यात आली.
दरम्यान, १३ जानेवारी रोजी गस्त घालत असताना बावधन पोलिसांना काळ्या काचा असलेली एक कार पकडली. कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, चार कोयते आणि गुप्ती अशी शस्त्रे आढळून आली. याप्रकरणी सुमित करेकर याला अटक करण्यात आली.
तिसऱ्या कारवाईमध्ये हरी पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. सुमित आणि हरी यांनी त्यांच्याकडील पिस्तूल रेकॉर्डवरील गुन्हेगार आदेश टेमकर यांच्याकडून आणले असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आदेश याला अटक केली.
चौथ्या कारवाईमध्ये सुमित करेकर याचे तडीपार साथीदार गणेश पाटेकर आणि एक अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. आरोपी कोयते घेऊन दहशत पसरवताना आढळून आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते, पोलिस निरीक्षक भास्कर कदम, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत महाले, पोलिस उपनिरीक्षक बंडू मारणे, पोलिस अंमलदार बापूसाहेब धुमाळ, फारूक मुल्ला, संजीव सावंत, विक्रम कुदळ, मनोज राठोड, अरुण नरळे, विक्रांत चव्हाण, तौसिफ मोहम्मद, दत्ता शिंदे, स्वप्नील कांबळे, संतोष बंडगर यांनी केली.






















Join Our Whatsapp Group